मुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस

मराठी माणूस हा मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात होता, अतिशय सरळ आणि साधा, सर्वांना आपलेसे करणारा, मदत करणारा, डोळे बंद करून विश्वास टाकणारा, सण आणि संस्कृती जपणारा होता. सगळ्यात महत्वाचा दुर्गुण म्हणजे तो अतिशय भावनिक होता. ह्याचा फायदा राजकारण्यांनी घेतला, परप्रांतीयांनी घेतला. राजकारण्यांनी आपली मते पक्की केली, आणि ह्या सरळ स्वभावाचा फायदा परप्रांतीय उद्यजकांनी उचलला.
मराठी माणसाला करोडोची संधी देखील आली तरी तो सोडून जात नव्हता, भावनिक दृष्ट्या तो कंपनीशी आणि मालकाशी जोडला गेला होता आणि राजकारणाशी पण. कंपनीच्या मालकांची आणि राजकारण्यांची मुले हि इंग्लिश मिडीयम मध्ये शिकत होती व नंतर परदेशात शिकायला जाऊ लागली, आणि तेच सामान्य मराठी माणसाला आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवा असे आव्हाहन करू लागली. मराठी माणूस साधाभोळा, डोळे बंद करून विश्वास ठेवणारा, मोठ्या लोकांची मूळ इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, आपली नाही असे बोलणारा.
काळ कुणाला सोडत नाही, तो मुंबई बाहेर फेकला गेला, मुंबई उपनगराबाहेरही फेकला गेला, आता तो ठाणे आणि त्यापुढील भागात सध्यातरी टिकून आहे. मुंबईची कोळी आगरी संस्कृती लुप्त झाली, जी पण आहे ती चाळींमध्ये आहे, परप्रांतीय संस्कृती पॉश इमारतीत आली. पॉश इमारतींमध्ये बोर्ड लागू लागले, "मांस खाणाऱ्यांना ह्या इमारतीमध्ये खोली विकत घेता येणार नाही." काही दिवसांनी बोर्ड लागतील कि ह्या इमारतीत मराठी लोकांना प्रवेश नाही.
राजकारण्यांना मराठी लोकांकडून फक्त मतांचाच फायदा होतो, आणि उद्योगपतींकडून नोटांचा फायदा होतो. राजकारणी मत तुमची मागणार पण कामे उद्योगपतींची, श्रीमंत लोकांची करणार. त्यांचेही काही चुकत नाही, ते त्यांचे काम आहे, पण मराठी माणसांचे काय? दादर मध्ये मराठी शाळेमध्ये कोणीही एडमिशन घेत नाही, ह्याचा अर्थ साधा आणि सोपा होतो कि मागच्या समाजाने आणि त्यांनी निवडून दिलेल्या राजकारण्यांनी कामे केली नाहीत.
जर तुम्ही खाजगी कंपनीत कामाला आहात आणि तुम्ही काम केले नाही तर तुम्हाला काढून टाकले जाते, हा पण विचार केला जात नाही कि तुम्ही कुठच्या प्रदेशाचे आहात किंवा कुठची भाषा बोलतात, ह्याचा खाजगी कंपन्यांवर काहीच फरक पडत नाही, ते लगेच काढून टाकतात, पण राजकारणाचे असे नाही आहे, ते जाती धर्म ह्या सारख्या भावनिक मुद्द्यांवर अवलंबून असल्यामुळे लोक विचार करत नाहीत व परत त्यांनाच निवडून देतात.
तुमचे घर तुम्हालाच चालवायचे आहे, तुमचे आयुष्य तुम्हालाच जगायचे आहे. तुमच्या भावनांना जगात किंमत नाही, तुम्हाला दगड व्हावेच लागेल, दुसरा कोणीही तुमचा गैर फायदा उचलता कामा नये, जसे तुमच्या पुढारीला त्यांच्या मुलांचे उत्तम भविष्य करायचा अधिकार आहे तसाच तुम्हालाही आहे, फक्त थोडे आत्मकेंद्रित व्हावे लागेल. जो काळानुसार बदलतो तोच जगतो, जो बदलत नाही तो संपून जातो किंवा त्याच्या पिढ्या ह्या गुलामीचे आयुष्य जगतात.
आता पळणे बास, परत मुंबईमध्ये यायचा प्रयत्न करा. मला आमच्यासारख्या तरुण तरुणींकडून अपेक्षा आहे, त्यांना एकच सांगतो कि संविधान लिहिणारा, रिझर्व्ह बँक ची स्थापना करणारा, अटकेपार झेंडा लावणारा, बलाढ्य शत्रूला कोंडीत पकडून संपवणारा, इंग्रजांना घाम फोडणारा, पहिले शेअर बाजार स्थापन करणारा हे सगळे मराठीच होते.
आर्थिक ताकद आपली असलीच पाहिजे, जगाच्या प्रत्यक काना कोपऱ्यात मराठी पोचलाच पाहिजे, झोपतानाही समृद्धीची स्वप्ने पडलीच पाहिजे.
धन्यवाद,
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार