चायवाला सॉफ्टवेअर इंजीनिअर

धंदा तोच चहाचा, पण त्याला जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनिअर किंवा नवं विचारांचा तरुण करतो तेव्हा चमत्कार घडतो. एकतर काळानुसार तुम्ही स्वतः मध्ये बदल करत जा नाहीतर दुसरा काळानुसार बदललेला माणूस त्या उद्योग धंद्यामधील नफा कमी वेळेत घेऊन जाईल. जो काळानुसार बदलतो तोच जीवनात राहतो हा उत्क्रांतीचा अटळ नियम आहे.
ज्यांना खऱ्या अर्थाने "स्टार्टअप इंडिया‘ समजलाय, अशा तरुणांनी उत्तुंग भरारी घेण्यासाठी पंख पसरविले आहेत. अगदी किराणा मालापासून ते लाखो रुपयांची उत्पादने आज ऑनलाइन मागविता येतात. विदेशातला पिझ्झा ऑनलाइन खपू शकतो, तर आपला चहा का नाही, असं म्हणत भुवनेश्‍वरमधल्या एका तरुणाने थेट "एककप.इन‘ची स्थापना केली. ऑनलाइन चहाचे दुकान ही संकल्पना जरी विचित्र वाटत असली, तरी अवघ्या चार महिन्यांत तो त्यात चांगलाच यशस्वी झाल्याचं दिसतंय...
सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे रात्री अपरात्री काम करावे लागे, डोकं बधीर झालं, की चहाची तलफ येई; पण एवढ्या रात्री चहा पिण्यासाठी लांबचे कट्टे, नाके गाठावे लागत. कधी कधी प्रवासातच जीव दमून जाई आणि मग कामाचा बट्ट्याबोळ होई. दुसऱ्यांच्या वेबसाइट्‌स आणि सॉफ्टवेअर्स डेव्हलप करत असताना भुवनेश्‍वरमधल्या सुकल्याण दासला चहाच्या ऑनलाइन विक्रीची कल्पना सुचली आणि "एककप.इन‘चा जन्म झाला. त्याच्याचसारख्या "आउट ऑफ बॉक्‍स‘ विचार करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनीदेखील ही अफलातून अशी संकल्पना उचलून धरली आणि आज संपूर्ण भुवनेश्‍वरमध्ये त्यांचा चहा अनेकांची "तलफ‘ भागवत आहे.
शेअर अ कप
तुमचा मित्र किंवा मैत्रीण सुटीच्या दिवशी ऑफिसमध्ये एकटीच काम करत असेल किंवा तुम्हाला तुमच्या चहावेड्या प्रियजनांना सरप्राइज द्यायचे असेल, तर तुम्ही "शेअर अ कप‘च्या माध्यमातून त्या माणसाचा पत्ता देऊन ऑनलाइन ऑर्डर प्लेस करू शकता. सध्या त्यांच्याकडे दोन डिलिव्हरी बॉईज असून, ते केवळ 30 मिनिटांच्या आत भुवनेश्‍वरच्या कानाकोपऱ्यात चहा पोचवित आहेत. सध्या त्यांची सेवा सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी पाच या वेळेतच उपलब्ध असली, तरी दिवसाला सुमारे 500 कप चहा जात असल्याने त्यांचा बिझनेस तोट्यात तरी चाललेला नाही.
कमी भांडवलात मोठा फायदा
स्वत:ची सॉफ्टवेअर फर्म चालविणारा सुकल्याण सांगतो, की मला या व्यवसायाची सुरवात करताना कसलाच त्रास झाला नाही. त्या मानाने कमी भांडवल आणि उपलब्ध मनुष्यबळावर होणारे काम असल्याने जानेवारीमध्ये आम्ही प्रायोगिक तत्त्वावर ओळखीच्याच लोकांसाठी "एककप‘ सुरू केला. परंतु कंपन्यात आणि अन्य ठिकाणी माझ्याच काही माजी सहकाऱ्यांपुढे "चायवाला‘ म्हणून उभे राहणे सुरवातीला अवघड गेले, पण त्यांनीही प्रोत्साहन दिल्याने आमचा आत्मविश्‍वास वाढला.
"एककप‘मुळे ग्राहक खूश
सध्या आम्ही इंडियन मिल्क टी, लेमन टी, मसाला टी, ग्रीन टी आणि मटका टी अशा पाच प्रकारांतील चहा लोकांना पुरवित आहोत. साध्या चहाची किंमत 7 रुपये असून, मटका आणि स्पेशल मलाई मारके मटका चहाची किंमत 10 रुपये आहे. आमच्या चहाची वेगळी चव, आमचे मसाले आणि किंमत यामुळे सध्या ग्राहकवर्ग आमच्या "एककप‘मुळे खूश असल्याचेही सुकल्याण आवर्जून नमूद करतो.
अश्विनीकुमार फुलझेले
 चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार