मुख्य मुंबई, पश्चिम मुंबई उपनगर आणि नवी मुंबई मधून उध्वस्त झालेला इमानदार, सरळ मार्गाने चालणारा मराठी

आजची भारतातील सगळ्यात श्रीमंत वसाहत हि मुख्य मुंबई मध्ये आहे. तिथे कधी काळी आगरी आणि कोळी ह्यांचे वास्तव होते ते आता अतिशय संकुचित होत गेले आहे.
कधी काळी मुंबई चा मुख्य रहिवासी हा कोळी आणि त्या पाठोपाठ आगरी हा दिसेनासा झाला आहे. राजकारणी सोडली तर ९८ टक्के मुंबईचा रहिवासी हा संपवण्यात आला आहे.
मनुष्याच्या अस्ताला तो च जबाबदार असतो, कारण जो हार मानतो तो रणांगण सोडून जातो, हा इतिहास आहे मनुष्य प्राण्याचा.
त्यानंतर गिरणी कामगार उध्वस्त झाला, मराठी मुख्य मुंबई मधून मुंबई उपनगरात जाऊ लागला, त्यानंतर मुंबई उपनगर सोडून तो ठाणे कल्याण ह्या ठिकाणी जावू लागला, त्यांतर पाठ दाखवत पळत तो खोपोली आणि गाव गाठायला लागला.
खरे म्हणजे पाठ दाखवत पळणे हे काही भित्रे पणाचे लक्षण नव्हते, त्याला चतुराईने पळवले गेले. त्यांच्या सरळ स्वभावाचा फायदा पूर्ण पणे उचलला गेला. त्याच्या भावनेशी खेळले गेले, धोके तर प्रचंड दिले आणि पाठीवर वरही खूप करण्यात आले.
हेच नवी मुंबई वसवण्यासाठी करण्यात आले. मोठ मोठे मराठी शेतकऱ्यांचे मोर्चे आणि नेते संपवण्यात आले. तिथला आगरी हा जवळपास आयसीयू वर आहे. जवळपास तो १० ते ३० वर्षात संपून जाईल.
जात धर्म आणि राजकारणात त्याला इतके व्यस्त ठेवण्यात आले कि दंगली मध्ये मुक्त अर्थ व्यवस्थेचा स्वीकार करत त्याचे परिणाम हे साल २००० नंतर दिसण्यात आले.
आता तर शेवट असा आहे कि कुणीच काहीही करू शकत नाही. जिथे मच्छी चा सुगंध यायचा तो शहरी संस्कृतीला तो घाण वास वाटू लागला आहे. कधी काळी कोळी आगरी लोकांची संस्कृती हि बंगले सोडून चाळी मध्ये आणि त्यापुढे झोपडीमध्ये तग धरू पाहत आहे.
मुंबई जवळून आलेली मराठी मंडळी हि परत कोकण, पुणे नाशिक अश्या ठिकाणी परत जात आहे. कुठेही गेले तरी स्वभाव तर बदलावाच लागेल. ज्या स्वभावामुळे माझे माझ्या पिढ्यांचे आणि मराठी समाजाचे नुकसान झाले तोच स्वभाव धरून आताच्या काळात चाललो तर शेवटचा मराठी उरायला काही वेळ लागणार नाही.
तुम्हाला पिढ्यान पिढ्यांचे नोकर बनायचे आहे कि पिढ्यान पिढ्यांचे मालक बनायचे आहे? श्रीमंत आपल्या मुलाला सांगतो : "ह्याचे वडील आपल्याकडे नोकर होते आणि आता त्यांचा मुलगा आपला नोकर आहे.", नोकर आपल्या मुलाला सांगतो : "ह्याचे वडील अगोदर हा उद्योग, व्यवसाय सांभाळायचे आता त्यांचा मुलगा हा मालक झाला आहे."
काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलतो तोच निसर्ग नियमानुसार टिकतो. आता पळणे बंद करा. पाण्यासारखे बना, कधी बर्फ तर कधी वितळलेले पाणी. कधी कोल्हा तर कधी वाघ, कधी कावळा तर कधी गरुड.
शत्रू जर बलाढ्य असेल तर लपून पाठून वार करा. हरा किंवा जिंका, मान्य करा आणि योजनेमध्ये बदल करत जा. ध्येय फक्त सोडू नका. अति विश्वास कुणावर टाकू नका. प्रत्यक ठिकाणी स्वतः जातीने लक्ष्य घाला.
जग तुम्हाला नाव ठेवेल ते मनावर घेवू नका. आपल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा. कर भला तो हो भला हे अजून मला वास्तवात दिसले नाही, अशी अनेक उदाहरणे देवू शकतो कि वाम मार्गाने कमावलेल्या पैश्यांवर पिढ्या ह्या सुखी झाल्या आहेत आणि इमानदारीच्या पैश्यांवर जगणारे हे आपल्या पिढ्यांसाठी परत शून्य पासून सुरवात ठेवून गेले आहे. हि उदाहरणे तुमच्या जवळपास कितीतरी असतील, जास्त लांब जायची गरज नाही.
सिनेमा आणि वास्तव आयुष्य ह्या मध्ये खूप फरक आहे. लोकशाही च्या देशात अघोषित हुकुम शाही बघितली आहे. पैश्यांच्या जोरावर कायदे नियम मोडताना बघितले आहे. सामान्य लोकांचा पदोपदी अपमान होताना बघितले आहे आणि तीच लोक मिडिया समोर येवून इमानदारीच्या आणि लोकशाहीच्या मोठ मोठ्या बाता करताना बघितल्या आहेत.
नेते आपल्या मुलांसाठी पक्ष, त्याचे पद, संपत्ती आणि पावर ठेवून जातात, आणि कार्यकर्त्यांची मुल हि कोर्ट आणि पोलीस च्या केसेस घेवून असतात, नोकरी शोधतात किंवा छोटा मोठा व्यवसाय करत असतात.
मर्यादित, संकुचित आणि लाचारीची विचारसरणी सोडा. नैतृत्व करा. एकटे चाला. निर्णय घ्या, धोका पत्कारा, १० ते ६ नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारे बना. उंच उडी घ्या, धाडसी पालकांचे मुलच धाडसी बनतात. मुलांना आपण करत असलेली धडपड बघू द्या.
इतिहास साक्षी आहे कि धूर्त लोक हि पिढ्यान पिढ्या टिकून राहिली आहेत. कालही होती, आजही आहेत आणि भविष्यातही राहणार. तुम्हाला पदोपदी ह्यांचा सामना करावाच लागेल. आणि जो त्या क्षणी सक्षम तोच जगण्याचे युद्ध जिंकेल.
उत्क्रांतीचा सिद्धांत सुद्धा हेच सांगतो कि जो काळानुसार, परिस्थितीनुसार बदलतो तोच टिकतो. बाकी बदलाच्या ओघात संपून जातात, जसे मुंबई मधील इमानदार सरळ मार्गी चालणारा मराठी माणूस.
लवचिक बना. मानसिक दृष्ट्या कणखर बना.
पुढील लेखामध्ये मी अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार