अकबर बिरबल आणि धन्नासेठ


जरूर वाचा फार वर्षांपूर्वी लहान असताना शाळेत ऐकलेली गोष्ट :
एकदा अकबर बादशहाच्या सैन्याची फार दिवस लढाई चालू होती.युद्धामुळे शाही खजाना संपत आला होता.
राजाने बिरबलला विचारलं, "खजाना कसा काय भरायचा ?."
बिरबल: तुम्हाला धन्ना सेठ (व्यापारी) कडून खजाना मिळू शकतो.
अकबराला आश्चर्य वाटले की एखाद्या व्यापाऱ्याकडे एवढे धन कसे असू शकते,तरी तो धन्ना सेठकडे गेला.
धन्ना सेठ: बादशहा ! माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे,तुम्हाला हवं एवढं धन तुम्ही घेऊन जा.
अकबर: सेठ ! मी तुम्हाला शिक्षा करणार नाही,फक्त मला सांगा कि तुम्ही एवढी संपत्ती कशी जमविली ?
धन्ना: मी धान्यात आणि मसाल्यात भेसळ करून ही माया जमविली.
अकबराला राग आला,त्याने धन्नाची सर्व संपत्ती जप्त केली आणि त्याला शाही घोड्यांच्या तबेल्यात घोड्याची लीद उचलायची शिक्षा दिली.धन्नाने ती मान्य केली.
बरीच वर्षे निघून गेली.बादशहा अकबराला परत अशा दीर्घ युद्धाला तोंड द्यावे लागले आणि खजाना लवकर रिता झाला.बिरबलाने परत धन्ना सेठ कडे मदत मागायचा सल्ला दिला.
अकबराला आश्चर्य वाटले : बिरबल अरे मी त्याला घोड्याची लीद उचलायचे काम दिलं आहे,त्याच्याकडे कसली आलीय संपत्ती ?
बिरबल: बादशहा ! तुम्ही त्याला विचारा तर खरं.तोच तुम्हाला मदत करू शकतो.
अकबर धन्नाकडे गेला. धन्नाने अकबराला भरपूर धन दिले.
अकबर: धन्ना सेठ ! मी तर तुझी सर्व संपत्ती जप्त केली होती मग तु ती परत कशी मिळवली ?
धन्ना: तबेल्याचा प्रमुख व देखभाल करणारे सेवक यांच्याकडून. ते घोड्याला पोटभर खाऊ घालत नव्हते. मी त्यांना धमकावले कि तुम्ही लोक घोड्याला भरपेट खाऊ घालत नाहीत,त्यामुळे त्याची लीद चांगली येत नाही ही गोष्ट मी बादशहाला सांगेन. मला चूप राहण्यासाठी ते मला लाच देत होते.
अकबर परत रागावला आणि धन्नाला समुद्राच्या लाटा मोजायची शिक्षा देऊन त्याची सगळी संपत्ती घेऊन महालावर परतला.
नशीब पहा,असंच दुसऱ्या एका दिर्घकालीन युद्धामुळे शाही खजाना रिकामा झाला आणि बिरबलाने अकबराला धन्नाकडे मदत मागायचा सल्ला दिला.
अकबराला विश्वास नव्हता कि समुद्राच्या लाटा मोजून धन्ना कशी काय संपत्ती गोळा करू शकतो ?
तरीही अकबराने धन्नाकडे मदत मागितली.
धन्ना: बादशहा ! तुम्हाला हवं तेवढं धन तुम्ही घेऊन जा पण यावेळेस मी माझा धंदा सोडणार नाही.
अकबर: ठिक आहे पण मला सांग तरी कि समुद्री लाटा मोजल्याने तुला एवढं धन कसे मिळाले ?
धन्ना: फार सोपं होतं, मी व्यापाऱ्यांची जहाजं आणि बोटी किनाऱ्यापासून दूरच उभी करायचो. त्यांना तुमचा आदेश दाखवायचो कि तुम्ही मला समुद्री लाटा मोजण्याचे काम दिले आहे आणि त्यांच्या जहाज आणि बोटींमुळे माझ्या कामात अडथळा येतो म्हणून त्यांनी दूरच थांबावं. बादशहा ! त्यांची जहाज आणि बोटी किनाऱ्यावर जाऊन माल उतरविण्यासाठी ते मला लाच द्यायचे.
बादशहाला कळून चुकले कि हा धन्ना कोणत्याही धंद्यात किंवा व्यवसाय किंवा कामात लोकांना वेठीस धरून लाचखोरी करू शकतो आणि माया जमा करू शकतो.
काळ कुठलाही असो, आपल्या समाजातील धन्ना सेठ माया जमा करण्याचा काही ना काही मार्ग शोधून काढतीलच आणि काळा पैसा जमा करतील.जनता पण आपली कामे करून घेण्यासाठी अशा लोकांना लाच देत राहतील आणि काळी माया जमा करण्यास हातभार लावतील.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार