तुम्ही कोण आहात ? गाढव 'अ' कि गाढव 'ब' ?




हि आहे दोन गाढवांची गोष्ट !
एका धोब्याकडे दोन गाढवं होती.
आपण त्यांना गाढव 'अ' आणि गाढव 'ब' असे म्हणू ....
गाढव 'अ' अतिउत्साहि होते. आपण किती काम करतो, किती मेहनती आहोत असा सतत आव आणायचं ! धोब्याने आपल्याकडे सतत लक्ष्य द्यावे, आपल्याच पाठीवर शाबासकीची थाप मारावी म्हणून सतत वेगात चालायचे. जास्तीत जास्त ओझे पाठीवर लादून घ्यायचे.
गाढव 'ब' त्या मानाने जरा भोळसटच होते. धोब्याच्या पुढे पुढे करणे त्याला काही जमायचे नाही. तशी गरजहि वाटायची नाही. धोबी आसपास असो नसो ते त्याच्याच वेगात चालायचे. शिस्तीत काम करायचे.
हळूहळू या दोन गाढवान मधला फरक धोब्याच्या लक्ष्यात यायला लागला. एक गाढवं वेगाने चालतंय. जास्तीत जास्त ओझे पाठीवर घेतय. दुसरे मात्र त्याच्या तुलनेत मागं पडतंय. धोबी 'अ' गाढवाचं कौतुक करायला लागला . 'ब' गाढवाला मात्र रट्टे बसायला लागले. त्याची सतत 'अ' शी तुलना व्हायला लागली. हि अनाठाई स्पर्धा 'ब' गाढवाला काही कळेना. शेवटी एकदिवस तो 'अ' गाढवाला भेटला. त्याला म्हणाला मित्रा येथे आपण दोघंच आहोत. उगाच कशाला एकमेकांशी स्पर्धा करायची. त्यापेक्ष्या आपण ओझे वाटून घेऊ, उगाच मरमरून धावण्या पेक्ष्या शांतपणे पुढे जाऊ. एकमेकांनाच मागे टाकण्यात कसले आलंय यश?
पण याचा परिणाम उलटाच झाला. 'अ' ला वाटायला लागल, याच्यात काही दम नाही. हा आपल्याला घाबरला. आपण पुढे जातोय म्हणून याच्या पोटात दुखतंय. आता जीरउच याची !
म्हणून 'अ' गाढव जास्त वेगाने चालायला लागले. जास्त ओझे पाठीवर घ्यायचा आटापिटा करायला लागलं.
धोबी त्याच्यावर जाम खुश होता. पण 'ब' ची धीमी गती पाहून त्याचा पारा चढायचा. त्याने 'ब' गाढवाला चोपायला सुरवात केली. 'ब' नेही आपला वेग वाढवला. पण त्याची दमछाक होत होती. इकडे 'अ' ला आणखीनच चेव चढला. 'ब' मागे पडतोय. धोबी आपल्याला शाबासकी देतोय या आनंदात ते धावत होते. धावतच होतं. गाढव 'ब' या धावण्यात पुरते खचले आणि एक दिवस कोसळले. 'ब' गाढव मेल.
'अ' बोजा उचलतोय म्हणून धोबी त्याच्या पाठीवर आता 'ब' च्या वाटेचे ओझेही ठेवायला लागला. आपण कसे थोर, 'ब' कसा पुरता संपला या नादात 'अ' च्या अंगात हत्तीचे बळ संचारले. तो उत्साह पाहून धोब्याच्या त्याच्याकडून अपेक्षाहि प्रचंड वाढल्या.
पण हे बळ फार काळ काही टिकल नाही. क्षमतेपेक्षा चौपट ओझे पाठीवर घेउन 'अ' गाढवाच्या पायातले त्राण जायला लागले. प्रयत्न करूनही त्याला आता धोब्याच्या अपेक्षे प्रमाणे काम करणे काही जमेना. धोबी संतापला. कालपर्यंत तुफान काम करणारं गाढव आता मंदावायला लागल्याने धोब्याने त्याला बदडायला सुरवात केली. मात्र जीवापाड प्रयत्न करूनही 'अ' गाढवाला पूर्वीसारखे काम होईना.
धोबी जाम वैतागला. संतापला. त्याला मार मारून दमला. शेवटी हे गाढव कामचुकार झालंय असे समजून त्याने 'अ' गाढवाची खाटिकखाण्यात रवानगी केली.
आणि नवीन गाढव विकत घ्यायला बाजारात रवाना झाला.

तात्पर्य :-

१)जगात काम करताना, करियरसाठी जीवाचं रान करून राब राब राबताना आपल्या सहकार्यांना कमी लेखू नका. ते त्यांचा कामाचा वाटा उचलत असतात, म्हनुनच तुमच्या वाट्याला तुमच्या लायकीचे काम येते हे विसरू नका. त्यांना मागे खेचायला जाल तर तुम्ही खड्यातच पडाल.

२) साहेबाच्या कितीही पुढे पुढे केलंत तरी शेवटी त्याच्या दृष्टीने तुम्ही काम काय करता. किती रिझल्ट देता हे महत्वाचं. सहकार्यांना डिवचण्यासाठी बॉसची ढाल करू नका.

३) तुम्ही 'अ' गाढव आहात का 'ब' गाढव आहात याला बॉसच्या लेखी काही किमत नाही. त्याचा लेखी तुम्ही फक्त एक 'गाढव' आहात हे विसरू नका.

४) आणि सगळ्यात महत्वाचे गाढवपणा करत ढोर मेहनत करून अनाठाई कष्ट करू नका. त्यापेक्ष्या तुमचे काम उत्तम आणि अधिक गुणवत्तेचे कसे होईल, हे बघा. तुमच्या साहेबांनाही हेच् अपेक्षीत असेल !!

"नेव्हर वर्क हार्ड, वर्क स्मार्ट..."
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार