स्मार्टफोन कंपन्यांना दणका; टिकाऊपणा आणि दुरुस्तीसाठी युरोपियन युनियनचे चे कडक नियम.

 युरोपियन युनियनने (EU) स्मार्टफोनची बांधणी कशी असावी आणि मुख्य म्हणजे ते किती काळ टिकायला हवेत, याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. जून २०२५ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत टप्प्याटप्प्याने लागू होणारी ही नवीन नियमावली टिकाऊपणा (Durability) आणि दुरुस्तीक्षमता (Repairability) यावर भर देते, ज्यामुळे स्मार्टफोन तयार करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होऊ शकतात.

हे नवीन नियम ब्रँड्सना मूलभूत गोष्टींचा पुनर्विचार करण्यास भाग पाडतात: अशा बॅटरी ज्या लवकर खराब होणार नाहीत, अनेक वर्षांपर्यंत उपलब्ध राहणारे सुटे भाग आणि विशेष उपकरणांशिवाय दुरुस्त करता येतील अशी उपकरणे. नवीन नियमांनुसार, २०२७ पर्यंत वापरकर्ते स्वतःच्या घरच्या घरी बॅटरी बदलू शकतील.

जून २०२५ मध्ये सुरू झालेल्या या नियमावलीच्या पहिल्या टप्प्याने आधीच याची दिशा निश्चित केली आहे. युरोपमध्ये विकल्या जाणाऱ्या फोनना आता टिकाऊपणाच्या कडक निकषांची पूर्तता करावी लागेल. कंपन्यांना सुटे भाग अनेक वर्षांपर्यंत उपलब्ध करून द्यावे लागतील आणि ते स्वतंत्र दुरुस्ती सेवांना (Independent Repair Services) रोखू शकणार नाहीत.

सर्वात मोठा आणि दृश्य बदल फेब्रुवारी २०२७ मध्ये दिसून येईल. तेव्हापासून, स्मार्टफोनची रचना अशी असणे बंधनकारक असेल की वापरकर्ते कोणत्याही सर्व्हिस सेंटरवर अवलंबून न राहता, साध्या उपकरणांच्या मदतीने स्वतः बॅटरी बदलू शकतील. अनेक वापरकर्त्यांसाठी, फोन बदलण्याचे कारण डिव्हाइस खराब होणे हे नसून, दिवसभर न टिकणारी कमकुवत बॅटरी हे असते.

थोडक्यात सांगायचे तर, हे नियम स्मार्टफोनचे उपयुक्त आयुष्य वाढवण्यासाठी आहेत. या नियमावलीची व्याप्ती मोठी असून त्यात उपकरणांची बांधणी, तांत्रिक सहाय्य आणि दुरुस्तीबाबत खालील बाबींचा समावेश आहे:

  • वापरकर्त्यांना बदलता येण्याजोग्या बॅटरी: यासाठी साध्या आणि बाजारात सहज उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करता येईल.

  • बॅटरीची क्षमता: ८०० चार्ज सायकल्स पूर्ण झाल्यानंतरही बॅटरीची क्षमता किमान ८० टक्क्यांपर्यंत टिकली पाहिजे.

  • सुटे भाग: फोन लाँच झाल्यापासून १० वर्षांपर्यंत त्याचे सुटे भाग उपलब्ध करून द्यावे लागतील.

  • त्वरित पुरवठा: मुख्य घटक साधारणपणे ५-१० कामकाजाच्या दिवसांत उपलब्ध होणे आवश्यक आहे.

  • दुरुस्ती मॅन्युअल्स: दुरुस्ती संदर्भातील माहितीपुस्तिका (Manuals) लोकांसाठी उपलब्ध असाव्यात.

  • थर्ड-पार्टी दुरुस्ती: स्वतंत्र किंवा थर्ड-पार्टी दुरुस्तीवर कोणतीही बंदी नसेल.

  • सुलभ सर्व्हिसिंग: उपकरणे उघडण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी सोपी असावीत.

ग्राहकांसाठी यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. युरोपमध्ये विकल्या जाणाऱ्या फोनवर आता बॅटरीचे आयुष्य, कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि 'रिपेअरॅबिलिटी स्कोअर' (दुरुस्ती सुलभता मानांकन) दर्शवणारी लेबल्स असतील. यामुळे ग्राहकांना खरेदी करताना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार